पुस्तक आणि तू
आता तुझ्या पुस्तकांना पण
तुझा सुगंध यायला लागेल…
त्यांना मी भरून उरात
आणि ठेवून दिलंय मनाच्या तळघरात…
मग तुला जाणवेल कदाचित…
पुस्तकंच खरी किती आपली असतात ते…!!!
हातात तुझं पुस्तक घेतल्यावर
तुझा चेहरा डोळ्यासमोर येईल,
ओठांवर मिश्किल हसू येईल,
काळजात एक वेदनेची आर्त हाक उमटेल…
आणि मग मी स्वत:लाच समजावेल,
की खरंच,
कुणाची का असेना…
पण पुस्तकंच खरी किती आपली असतात ते...!!!